"बँगलोर: चेंगराचेंगरी, उन्माद आणि समाजाचे आत्मपरीक्षण" (Banglore: Stampede, Celebration & the Urgency of Social Introspection)
बेंगळुरुतील ‘ रॉयल चॅलेंजर्स ’ संघाच्या आयपीएल २०२५ विजयानंतर झालेली जीवघेणी चेंगराचेंगरी ही केवळ अपघात किंवा नियोजनातील चूक नव्हे . ही घटना आपल्याला समाजाच्या मानसिकतेचे , सांस्कृतिक दारिद्र्याचे आणि राजकीय उथळपणाचे दर्शन घडवते . ११ निष्पाप लोकांचा मृत्यू हे फक्त आकडे नाहीत , तर आपण काय साजरे करतो आहोत , कशासाठी जमतो , आणि त्या उन्मादाला कोण खतपाणी घालते – या सर्व प्रश्नांची धगधगती उत्तरं आहेत . साजरा न झालेल्या यशाचा उन्माद दीर्घ काळ अपयश , उपेक्षा आणि सामाजिक दुर्लक्षिततेत राहिलेला समाज जेव्हा तात्कालिक , खोट्या यशाला भिडतो , तेव्हा तो त्याचं साजरं करणं हे उन्मादाच्या पातळीवर जातं . आपल्या समाजात ‘ माझं सगळं उत्तम चाललं आहे ’ हे दाखवण्याची गरज इतकी तीव्र आहे की , खऱ्या उन्नतीच्या अभावात भास निर्माण केले जातात – तलवारीने केक कापणं , कर्ज काढून डीजेवर नाचणं , वाढदिवस - लग्नात पैसा ओतणं . त्यामागे एक खोल सामाजिक न्यूनगंड आणि आत्ममूल्यहीन...