महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुका: भाजपची मुसंडी, मित्रपक्षांचे खच्चीकरण आणि विरोधकांची अधोगती
सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन करावे लागेल. त्यामागे दोन ठोस कारणे आहेत. पहिले म्हणजे त्यांनी विरोधकांशी एकहाती दोन हात केले आणि दुसरे, व अधिक महत्त्वाचे, म्हणजे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ज्या भूमिकेला पाठिंबा देत होते ती किती अयोग्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. विरोधक आधीच गलितगात्र होते; फडणवीस यांनी त्यांना मरणासन्न अवस्थेत आणले. मात्र खरी लढाई दिल्लीतील होती आणि ती फडणवीस यांनी एकट्याने, रा. स्व. संघाच्या पाठबळावर लढली.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या महापालिका निवडणुकाही फडणवीस यांनी स्वतःच्या राजकीय ताकदीवर जिंकून दाखवल्या. त्यामुळे दिल्लीतील त्यांचे वजन वाढणे अटळ आहे. आता या २९ महापालिकांच्या निकालांचा अन्वयार्थ लावणे फारसे कठीण नाही. या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच त्यांचा निकाल काय असणार, हे स्पष्ट दिसत होते. भाजपची मुसंडी अपेक्षितच होती, कारण समोर एकसंघ आणि ताकदीचा प्रतिस्पर्धीच नव्हता.
या निवडणुकांनी एक महत्त्वाचा मुद्दा ठळक केला, तो म्हणजे भाजप आधी आपल्या सहकारी पक्षांना गिळंकृत करतो. देशात असे एकही राज्य नाही जिथे भाजपने ज्या पक्षाच्या खांद्यावरून सत्तेत प्रवेश केला, तो पक्ष आज नष्ट होण्याच्या मार्गावर नाही. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, पंजाबमध्ये अकाली दल, ओडिशात बिजू जनता दल, आसाममध्ये आसाम गण परिषद – सर्वत्र हाच पॅटर्न दिसतो.
महाराष्ट्रातही हेच घडले. शिवसेनेच्या आधारावर राज्यात पाय रोवणाऱ्या भाजपने आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंगू केले आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खच्चीकरण सुरू झाले आहे. या निवडणुकांत ते स्पष्टपणे दिसून आले. भाजपच्या नगरसेवकांची संख्या फार वाढली नाही; पण शिवसेना आणि राष्ट्रवादीसारख्या सहकारी व विरोधी पक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटली.
मुंबईत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपशी हातमिळवणी करण्याच्या अपरिहार्यतेचे उत्तम उदाहरण ठरली. भाजपने शिंदेंना मदत केली खरी, पण जागा अशाच ठिकाणी दिल्या जिथे त्यांची थेट लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी होईल. या लढतीत उद्धव ठाकरे सरस ठरले. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला भाजपने त्यांना राखू दिला, मात्र आसपासच्या सर्व महापालिकांत शिंदे सेनेला जबर धक्का दिला. आगामी काळात हा दबाव अधिक तीव्र होणार, हे निश्चित.
पुणे आणि परिसरात अजितदादांच्या राष्ट्रवादीची अवस्था याहूनही केविलवाणी झाली. भाजपशी युती नको आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास, या भ्रमात अजित पवार राहिले. कधी शरद पवारांशी जवळीक दाखवणे, तर कधी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे, असा राजकीय दुटप्पीपणा त्यांनी केला. परिणामी पिंपरी-चिंचवडसारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा वा विदर्भ – सर्वत्र अजितदादांच्या राष्ट्रवादीची स्थिती शिंदे सेनेसारखीच झाली. फरक इतकाच, की शिंदेंकडे ठाणे आहे, तर अजितदादांच्या हाती एकही सुरक्षित गड उरलेला नाही. यावरून भाजपने आपल्या मित्रपक्षांची कशी राजकीय कोंडी केली हे स्पष्ट होते.
महत्वाच्या दिवसांसंबंधी असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
2.राष्ट्रीय अंतराळ दिवस २०२५ | National Space Day 2025 3.जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस २०२५ | World Senior Citizens Day 2025
विरोधकांबाबत बोलायचे झाले तर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे यांनी आपणच भाजपचे मुख्य प्रतिस्पर्धी असल्याची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात त्यांचे एकत्र येणे उशिरा झाले आणि अविश्वसनीय ठरले. सप्टेंबरमध्ये आणाभाका, कांदेपोहे झाले; पण प्रत्यक्ष युती निवडणुकीच्या अवघ्या दोन आठवडे आधी झाली.
त्यांच्या एकमेव संयुक्त सभेत अदानी समूहाचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र हा मुद्दा सामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला नसल्याने तो चालला नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा जोपर्यंत सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडला जात नाही, तोपर्यंत निवडणुकीत प्रभावी ठरत नाही, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केले आहे. मुंबई आणि मराठी अस्मितेचा मुद्दाही पुरेसा वेळ न दिल्याने प्रभावी ठरू शकला नाही.
या निवडणुकांतील तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (MIM) या पक्षाचा वाढता प्रभाव. संपूर्ण राज्यात मिळून एमआयएमला शंभरहून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. ही संख्या राष्ट्रवादीपेक्षाही अधिक ठरणार आहे. याचा अर्थ मुस्लिम मतदारांचा मोठा वर्ग काँग्रेसपासून दूर जाऊन एमआयएमकडे वळत आहे.
ही बाब काँग्रेससाठी गंभीर धोक्याची घंटा आहे. बडा घर पोकळ वासा अशी काँग्रेसची अवस्था झाली असून पक्षात नवचैतन्य आणण्याचे प्रयत्नच होत नाहीत. निवडणूक आयोगावर आरोप करणे सोपे आहे; पण पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, आणि ती सध्या फक्त भाजप करताना दिसते.
या अथक प्रयत्नांचे फळ भाजपला मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने आपली राजकीय मुसंडी ठसठशीतपणे मारली आहे. उरलेले आरोप – पैसेवाटप, धार्मिक ध्रुवीकरण – हे फक्त तोंडी लावण्यापुरतेच उरले आहेत.
मागील महिन्यातील चालू घडामोडीवरील पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा